आरवलीत कंटेनरचा भीषण अपघात

संगमेश्वर : तालुक्यातील आरवली येथे आज (२ जुलै) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा अचानक तोल गेल्याने त्याचा मागील भाग महामार्गावर आडवा झाला, तर इंजिनचा पुढील भाग उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रस्त्यावर उतरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हा कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. हा कंटेनर आरवली उड्डाणपुलाजवळ आला असता चालकाने ब्रेक लावताच कंटेनर घसरला आणि नियंत्रण सुटून तो उड्डाणपूलाच्या डिव्हायडरवर लटकला. सुदैवाने हा कंटेनर उड्डाणपूलावरून खाली कोसळला नाही. नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणांचा फरक पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा घटनास्थळी होती. अपघातामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती. कंटेनर हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त कंटेनर रिकामा होता.



