राज्यात पावसाचे थैमान; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील ४ जिल्ह्यांसाठी आज ‘रेड अलर्ट’ (अतिवृष्टीचा इशारा) तर ९ जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. किनारी भाग आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
या भागातील नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक तसेच विदर्भातील काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, येथेही मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी स्थानिक रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर आणि लोणावळा परिसरातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, आटलेल्या धरणांमधील पाणीपातळीत आता झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेचा वेग वाढला आहे. समुद्रकिनारी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता, पर्यटकांनी आणि घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



