मुख्य बातमी

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास दिन

ओंकार खांडेकर, ओंकार आठवले या विद्यार्थ्यांना व्याख्यानाची संधी

रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे ‘कालिदास दिन’ आज महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये साजरा करण्यात आला.

कालिदास दिनाच्या निमित्ताने दरवर्षी संस्कृत विभागातील पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना व्याख्यानासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची परंपरा आहे. त्यानुसार यावर्षी संस्कृत विषयात एम.ए. पदवीप्राप्त ओंकार खांडेकर तसेच इतिहास विभागातून पदवी प्राप्त करून सध्या त्याच विभागात ऑनर्सचे शिक्षण घेत असलेल्या ओंकार आठवले यांची व्याख्याने झाली.

प्रथम ओंकार खांडेकर याने ‘विक्रमोर्वशीयम् : एक रसास्वाद’ या विषयावर व्याख्यान देत महाकवी कालिदास विरचित विक्रमोर्वशीयम् या नाटकातील रसात्मकता, कथानक, आशयवैशिष्ट्ये आणि विविध साहित्यिक पैलूंवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. ओंकार आठवले याने ‘कालिदास : काळ व कार्य’ या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान देत कविकुलगुरू महाकवी कालिदास यांचे साहित्यिक योगदान, त्यांच्या काळाविषयीचे विविध मतप्रवाह आणि संस्कृत साहित्यातील त्यांचे स्थान यांचा परामर्श घेतला.

प्रा. डॉ. मकरंद साखळकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कला शाखा उपप्राचार्य संस्कृत विभागप्रमुख प्रा. डॉ.कल्पना आठल्ये यांनी मनोगतात शिष्यवृत्तीची माहिती दिली. व्याख्यात्यांचे तसेच शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तृतीय वर्षातील विद्यार्थिनी तेजस्विनी जोशी, पूर्वा खाडिलकर आणि दीप्ती गद्रे यांनी सुमधुर श्लोकगायन सादर केले. प्रास्ताविक प्रा. प्रज्ञा भट, सूत्रसंचालन विद्यार्थिनी स्मितल बेंडे हिने केले. मधुश्री वझे हिने आभार मानले.

बाळकृष्ण रघुनाथ बापट शिष्यवृत्तीचे प्रथमच वितरण

यावर्षीपासून कै. बाळकृष्ण रघुनाथ बापट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमेरिकास्थित डॉ. ओंकार जोशी यांनी दिलेल्या देणगीतून संस्कृत विभागातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदा प्रथम वर्षातील किर्ती प्रविण पुजारे, द्वितीय वर्षातील पूर्वश्री विनोद जावडेकर आणि तृतीय वर्षातील स्मितल मधुसूदन बेंडे या विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते शिष्यवृत्ती करून गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!