मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आंबा घाटात अज्ञात वाहनाची धडक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

संगमेश्वर : तालुक्यातील मिऱ्या–नागपूर महामार्गावरील आंबा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (१९ जुलै) पहाटे उघडकीस आली. दक्खन बसथांब्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रामा बाळू माशाळ (वय ३०, रा. खिलारहट्टी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) हे सापुचेतळे येथून विजापूरकडे दुचाकीने जात होते. पहाटेच्या सुमारास आंबा घाटात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील दुचाकीस्वाराला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक सूचना केल्या. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मृत रामा माशाळ यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, कुटुंबातील एका ज्येष्ठ महिलेच्या निधनानंतर सर्वजण मोठ्या वाहनाने विजापूरला जाण्याचे नियोजन करत होते. मात्र रामा यांनी त्यांचा सल्ला न ऐकता रात्री दीडच्या सुमारास दुचाकीने प्रवास सुरू केला. या पार्श्वभूमीवर त्यांचे नातेवाईक बाळू मल्लारी तांबे यांनी, “माझे ऐकले असते तर माझा भाचा आज जिवंत असता,” अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!