मुख्य बातमी

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मान्सूनने जोरदार मुसंडी मारली असून, हवामान विभागाने १९ जुलै ते २३ जुलै या पाच दिवसांच्या कालावधीसाठी राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात, चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. तसेच अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग वाढला असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहेत. १९ जुलै रोजी कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाचा हा सक्रिय टप्पा जनजीवन प्रभावित करू शकतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामानतज्ज्ञांनी केले आहे. विशेष म्हणजे, आज १९ जुलैसाठी राज्यातील १६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

यामध्ये अहिल्यानगर, पुणे, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. सोमवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज असून इतर कुठेही अलर्ट देण्यात आलेले नाहीत. २१ जुलै रोजी रायगड, पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत. तर २२ जुलै रोजी रत्नागिरी, रायगड पालघरसह नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज आहे. जूनमध्ये यंदा उशिरा सुरू झालेला पाऊस अलनिनोच्या सावटामुळे आणखी लांबला. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लावून पाहण्याची वेळ आली. दुसरीकडे धरणसाठा खालावल्याने पाणीटंचाईचे सावटही घोंगावत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!