मुंबई विद्यापीठाचा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरा
एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाकडून आशादीप संस्थेला धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यापीठातर्फे मुंबई विद्यापीठाचा वर्धापनदिन सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने शहरातील आशादीप निवासी मतिमंद (दिव्यांग) संस्थेत धान्य आणि विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील साळवी यांनी वस्तू आणि धान्य स्वरूपात मदत संकलित करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले होते. त्याला विद्यार्थ्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक आणि शिक्षेकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
आशादीप संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर, अध्यक्ष ॲड. विनय आंबुलकर, व्यवस्थापक स्मिता जडे तसेच लिपिक रसिका चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, सेवाभाव आणि मानवतेची भावना रुजण्यास मदत झाली. यानिमित्ताने समाजाच्या एका उपेक्षित घटकाशी विद्यार्थी जोडले गेले.
या उपक्रमाअंतर्गत तांदूळ, साखर, विविध डाळी व कडधान्ये, चहा पावडर, पोहे, आटा, मीठ, रवा, शेंगदाणे, गूळ, साबुदाणा, साबण, हँडवॉश, तेल, टूथपेस्ट, बिस्किटे, पॅराशूट तेल, फेस पावडर, मेणबत्त्या, काडेपेटी, सोयाबीन, तिखट, हळद, मोहरी, जिरे, बडीशेप आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.


