मुख्य बातमी

पोस्ट ऑफिसमधील आधार सेवा अधिक सक्षम; ४० हून अधिक नागरिकांसाठी विशेष शिबिराची सुविधा

रत्नागिरी : आधार नोंदणी व अद्ययावतीकरणासाठी पोस्ट ऑफिसवरील नागरिकांचा वाढता विश्वास लक्षात घेऊन डाक विभागाने आपली सेवा अधिक सक्षम केली आहे. जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या पोस्ट ऑफिसमध्ये आता अद्ययावत आधार सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धतीमुळे या केंद्रांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती डाक विभागाचे अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिली.

नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ सेवा मिळावी, यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत नवीन आधार नोंदणी, नाव, पत्ता आणि जन्मतारीख अद्ययावतीकरण, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल जोडणी, बायोमेट्रिक (ठसे व डोळे) अद्ययावतीकरण या सुविधा पुरविल्या जात आहेत.

डाक विभागाने एका अभिनव सुविधेची घोषणा केली आहे. त्यानुसार, एकावेळी ४० पेक्षा अधिक नागरिकांची आवश्यकता असल्यास विशेष आधार शिबिर आयोजित करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. हे शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, उद्योग-आस्थापना किंवा इतर सामाजिक संस्था यांच्यासाठी उपयुक्त आहे.

शिबिराच्या आयोजनासाठी ८६६९९१९८६० या रत्नागिरी विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवावा. रत्नागिरी प्रधान डाकघर, रत्नागिरी शहरातील सर्व पोस्ट ऑफिस, शिवाजीनगर, एमआयडीसी, कलेक्टर कार्यालय पोस्ट ऑफिस, खालगाव (जाकादेवी), पाली, सैतवडा, संगमेश्वर, राजापूर, देवरुख, लांजा, साखरपा, पाचल, कसबा, ओणी आणि कोंडये (राजापूर) येथील पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

आजच्या काळात शासनाच्या विविध योजना, बँकिंग सेवा, शैक्षणिक प्रवेश, मोबाईल सिम आणि इतर अनेक कामांसाठी आधार कार्ड हे अत्यावश्यक ओळखपत्र ठरले आहे. त्यामुळे नागरिकांनी आधारसंदर्भातील कोणत्याही नोंदणी किंवा बदलांसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्राचा लाभ घ्यावा. “विश्वासार्ह, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख सेवा देणे हेच डाक विभागाचे ध्येय आहे, त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!