स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून नाटे येथील चोरीचा गुन्हा उघड
दोघेजण ताब्यात: २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : नाटे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ते ५ मार्च २०२६ दरम्यान नाटे येथील यश होमस्टेच्या मागील बाजूस असलेल्या श्री. शहाणे यांच्या घरात भाड्याने राहणारे रोशन मोठाभाऊ बच्छाव (वय २७, मूळ रा. चिचावड, ता. मालेगाव, जि. नाशिक) हे कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यानंतर बॅगेतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ९१ हजारांचा ऐवज चोरून नेला होता.
या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता, २०२३ अंतर्गत कलम ३०५(अ) व ३३१(३)(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची स्वतंत्र तपास पथके नियुक्त करण्यात आली होती.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २८ जुलै २०२६ रोजी विकास टीपू पवार (वय २३) व संपत बिल्लू पवार (वय २०) या दोघांना कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही घरफोडीची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीस गेलेले ₹१.९१ लाख किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल नाटे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या सूचनेनुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले तसेच पोलीस अंमलदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, योगेश नार्वेकर आणि अतुल कांबळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

