२९० गावनिहाय आपले सरकार सेवा केंद्र; १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन

रत्नागिरी : ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा/लाभ मिळविण्यासाठी जिल्ह्यामध्ये २९० गावनिहाय आपले सरकार सेवा केंद्र स्थापण्याबाबत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व्यक्तींनी विहीत नमुन्यातील अर्ज माहिती तंत्रज्ञान विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
राज्याचे झपाट्याने डिजिटलायजेशन होत आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय/सेवा मिळविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या २७ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या दुप्पट करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत.
अर्जदाराने अर्जासोबत रहिवासी दाखला, आधार, पॅन, मतदान कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे (बारावी पास, पदवी, पदविका प्रमाणपत्र) एमसीआयटी अथवा सीसीसी चे प्रमाणपत्र, बँक पासबुकचा फोटो, पोलीस क्लिअरन्स (पीसीसी) प्रमाणपत्र/पावती जोडावी. कार्यालयाचे छायाचित्र, सीएससी प्रमाणपत्र, दिव्यांग/माजी सैनिक/स्वयंसहायता गटाच्या सदस्यत्वाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे जोडून इच्छुक व्यक्तींनी विहीत नमुन्यातील अर्ज माहिती तंत्रज्ञान विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावेत. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
आवश्यक माहितीसाठी ८३५५८६८०६७, ९०१८२०२८४१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. पात्र/अपात्र उमेदवारांची यादी www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
