कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : राज्यात काही भागांत पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी हवामान विभागाने आज सोमवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या हवामानात मोठे बदल झाले आहेत. नैर्ऋत्य राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून ५.८ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. कमी दाबाचा पट्टा ओराई, सिधी, दाल्तोंगज, बंकुरा ते मणिपूरपर्यंत पसरला आहे. दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर कर्नाटकपासून तामिळनाडूपर्यंतही कमी दाबाची रेषा सक्रिय असल्याने राज्यात पाऊस आणि ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे.
मुंबई वेधशाळेच्या हवामान अंदाजानुसार, सोमवारी रायगड, पुणे घाट, सातारा घाट, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात इतर ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. पुणे, सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरून प्रवास करताना धुकं आणि दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील नागरिकांनी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना उघड्यावर किंवा झाडांखाली थांबणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे.



