मतदार गणना प्रपत्रांचे १०० टक्के डिजिटायझेशन; रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत, मतदारांना घरपोच गणना प्रपत्र (Enumeration Form) वाटप करून त्याचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करण्यात रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या १४ मे २०२६ रोजीच्या निर्देशानुसार राज्यभरात ही विशेष मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत ३० जून २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्रांचे वाटप व संकलन करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री गायकवाड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत हे काम अत्यंत नियोजनबद्धरित्या आणि गतीने पूर्ण करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण यशाबद्दल जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचे व त्यांच्या पथकाचे प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे. यामध्ये २६३-दापोली डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, २६४-गुहागर वैशाली पाटील,
२६५-चिपळूण आकाश लिगाडे, २६६-रत्नागिरी: जीवन देसाई, २६७-राजापूर विश्वजीत गाताडे या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचा समावेश आहे.
या ऐतिहासिक कामगिरीमध्ये सर्व मतदारसंघांतील मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक आणि अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), सहाय्यक अधिकारी (ABLO), पर्यवेक्षक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या परिश्रमाचा आणि समन्वयाचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



