टेरवचे माजी पोलीस पाटील धोंडजीराव (आबा) कदम यांचे निधन

चिपळूण : टेरव गावचे माजी पोलीस पाटील धोंडजीराव (आबा) सखारामराव कदम (वय ९७) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. पंचक्रोशीत ते प्रेमाने ‘आबा’ या नावाने परिचित होते.
टेरव गावचा चालता-बोलता इतिहास आणि गावच्या सामाजिक जीवनाचे साक्षीदार असलेले एक ज्येष्ठ, अनुभवी व दसपटीतील आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. पोलिस पाटील म्हणून त्यांनी अनेक वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली. गावातील शांतता, सामाजिक सलोखा, एकोपा आणि ग्रामस्थांच्या हितासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.
ग्रामस्थांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. आपल्या साध्या, प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे, पणतवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.



