मुख्य बातमी

कासार्डेत आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी उत्सव

रत्नागिरी/कासार्डे : कासार्डे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील आमदार प्रमोद जठार मित्रमंडळातर्फे ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते रात्री ११ या वेळेत गोपाळकाल्यानिमित्त कासार्डे तिठा येथील महामार्गनजीक पटांगणामध्ये रु. १,११,१११ रकमेच्या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रम प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर सतीश मोरे आदी नेत्यांसह भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा आमदार प्रमोद जठार व दोन्ही जिल्ह्यांतील विविध पक्षांचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते व गाव मानकरी उपस्थित राहणार आहेत.

या मंडळाचे हे सलग १४ वे वर्ष असून, यावेळी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांना सहभागी होता येईल. आमदार प्रमोद जठार मित्रमंडळातर्फे दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात मानाची दहीहंडी म्हणून ही हंडी साजरी होते.

याप्रसंगी आठ थरांचे मनोरे रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला रोख रु १ लाख ११ हजार १११ रुपये व आकर्षक कोकण दूध चषक देण्यात येणार आहे. चार थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोख ३ हजार ३३३ रुपये, पाच थरांची सलामी देणाऱ्यासाठी ४ हजार ४४४ रुपये, सहा थरांची सलामी देणाऱ्यासाठी ५ हजार ५५५ रुपये, सात थरांची सलामी देणाऱ्यासाठी ६ हजार ६६६ रुपये व प्रत्येकी आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. यावेळी डी. जे. व ढोलपथकांच्या गजरासह दुपारी २.३० वा. गावातील स्थानिक प्रतिष्ठीत मानकरी व पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या हस्ते दहीहंडीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ होणार आहे. सायंकाळी ४ वाजल्यानंतर सध्या महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर गाजत असलेला कोल्हापूर येथील ३५ कलाकारांच्या संचातील रजनी गोरड प्रस्तुत ऑर्क्रेस्ट्रा धमाका म्युझिकल नाईट हा जुन्या नव्या मराठी-हिंदी रिमिक्स, लावण्या, उत्कृष्ट गायक-निवेदक नृत्यगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ कुपनचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. इच्छुकांनी माहितीसाठी व नावनोंदणीसाठी प्रमोद जठार मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव (९४०३२८९००५) अथवा रोहित महाडीक भाजप कार्यालय कासार्डे (७०६६९३१०५३) येथे संपर्क साधावा, असे आवाहन आम. प्रमोद जठार मित्रमंडळाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!