आरोग्यमुख्य बातमी

माता मृत्यू रोखण्यासाठी आणि सिझेरियन कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करा : जिल्हाधिकारी मनुज जिंदल

गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या आरोग्य विभागाच्या मॅरेथॉन बैठका

रत्नागिरी : जिल्ह्यातील माता मृत्यूचे प्रमाण, बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण पूर्णपणे रोखण्यासाठी तसेच सिझेरियन प्रसूती संख्या कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाशी संबंधित विविध समित्यांच्या मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ‘श्री गणेश आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी विशेष आरोग्य शिबिरे घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मल्लीनाथ कांबळे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

गरोदर मातेची नोंदणी झाल्यापासून तिच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवावे, जेणेकरून संभाव्य धोके टाळता येतील. खासगी रुग्णालयात रुग्णांना वर्ग करून होणाऱ्या अनावश्यक सिझेरियन डिलेव्हरींवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. बालकांचे योग्य पोषण झालेच पाहिजे; आरोग्य तपासणीसोबतच ‘आभा’ व ‘आयुष्मान भारत’ कार्ड वाटपाला गती द्यावी, आसे सांगून प्रादेशिक मनोरुग्णालयाला आवश्यक वैद्यकीय सुविधा सीएसआर (CSR) फंडातून उपलब्ध केल्या जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर : वैदेही रानडे
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नागरिक कोकणात दाखल होत असतात. त्याची सुरुवात झालेली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे रोग पसरू नयेत यासाठी आरोग्य यंत्रणेने २४ तास सज्ज राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले. सर्पदंश, श्वानदंश व विंचूदंशावरील लस, औषधांचा पुरेसा साठा आणि सुसज्ज रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, बालकांचे वजन वाढवण्यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये तंबाखू नियंत्रण जनजागृती मोहीम राबवण्यावर त्यांनी भर दिला.

जिल्ह्यातील आरोग्य स्थिती व कारवाईचा आढावा
तपासणी व उपचार : एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान ३६ विशेष शिबिरे घेऊन १,०५० सॅम (SAM) व मॅम (MAM) बालकांवर उपचार करण्यात आले.
प्रसूती आकडेवारी : एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यात एकूण ३,४१९ प्रसूती झाल्या; यात सरकारी रुग्णालयांत १,२९८ तर खासगी रुग्णालयांत २,१२१ प्रसूतींची नोंद असल्याची माहिती डॉ. आठल्ये यांनी दिली.
पीसीपीएनडीटी कारवाई : जिल्ह्यातील १०८ सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी सुरू असून, नियमभंग केल्याप्रकरणी मंडणगड येथील एका मल्टीस्पेशालिटी केंद्रावर ‘डेकॉय’ कारवाई करत सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!