मुख्य बातमी

रत्नागिरीतील कर्ला-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूक उत्साहात 

रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरयाचा जायघोष, ढोल ताशांचा गजर आणि सोबत फुलांची उधळण करत शहरातील कर्ले-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साही वातावरणात काढण्यात आली. यंदाचे हे या मिरवणुकीचे ४० वे वर्ष आहे.

मागील अनेक वर्षापासून कर्ला-आंबेशेत गावातील घरगुती गणरायांची मिरवणूक वाजतगाजत शहरामधून गावापर्यंत काढण्यात येते. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक निघते. विशेष म्हणजे ही मिरवणूक मोहल्ल्यातून जात असल्याने या मिरवणुकीला विशेष महत्त्व आहे.

या मिरवणुकीत जवळपास १२० गणेशमूर्ती होत्या. ढोल-ताशा पथकांसह, झांजपथक, कर्ला येथील गणराज मित्रमंडळाचे महिला लेझिम पथक, बेळगाव येथील बागलकोटचे बॅण्डपथक, शिवशक्ती चक्रीभजनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. सकाळी ९.३० वाजता कर्ला-आंबेशेत गणेश आगमन मिरवणुकीला श्रीफळ वाढवून सुरुवात झाली. या मिरवणुकीत माजी जि. प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे, शेखर घोसाळे, मुन्ना घोसाळे, किरण भाटकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले सहभागी झाली होती. जवळपास चार ते पाच तास ही मिरवणूक चालली.

शहरातील स्वा. सावरकर चौकातून सुरू झालेली ही मिरवणूक गोखले नाका, रामनाका मार्गे रत्नागिरी बस स्थानक, जयस्तंभ, शासकीय रुग्णालयमार्गे, निवखोल, कर्ला, आंबेशेत अशी काढण्यात आली. या मिरवणुकीत गणेशभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी तसेच पुष्पवृष्टी करण्यासाठी श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी उपस्थिती लावली होती.

या मिरवणुकी दरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी तीन वाजता ही मिरवणूक कर्ला- आंबेशेत येथे दाखल झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!