मुख्य बातमी

जिल्ह्यात ‘रोजगार महाकुंभ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

एकाच दिवशी १४ मेळावे : १७२ तरुणांना मिळाले नियुक्तीपत्र

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या ‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा’मार्फत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘रोजगार महाकुंभ’ उपक्रमाला बेरोजगार तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल १४ ठिकाणी रोजगार मेळावे पार पडले असून, यामध्ये विविध कंपन्यांमार्फत १७२ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.

या महाकुंभाचे मुख्य उद्घाटन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते स्थानिक गोगटे जोगळेकर महाविद्यालयात उत्साहात झाले. जिल्ह्यातील स्थानिक सुशिक्षित व कुशल तरुणांना रोजगाराची हक्काची संधी मिळावी आणि उद्योगांना योग्य मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रशासनाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

एकूण मेळावे : १४ केंद्रे (जिल्हाभरात एकाच दिवशी)

सहभागी कंपन्या/उद्योजक: १११

उपलब्ध रिक्त पदे: २,६१२

उमेदवारांची उपस्थिती: १,६४०

प्राथमिक निवड: ४३३ उमेदवार

अंतिम निवड (नियुक्ती): १७२ उमेदवार

जिल्हाभरातील प्रमुख केंद्रांवर आयोजन : मंडणगड, दापोली (कृषी विद्यापीठ), खेड, गुहागर (अंजनवेल आयटीआय), चिपळूण, लांजा, राजापूर, देवरूख आणि शिरगाव मत्स्य महाविद्यालय यांसह जिल्ह्यातील प्रमुख १४ शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या केंद्रांवर हे मेळावे पार पडले.

या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरच नामवंत कंपन्यांच्या मुलाखतींची संधी मिळाल्याने तरुणांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. २,६१२ रिक्त पदांसाठी झालेल्या प्रक्रियेत ४३३ जणांची प्राथमिक तर १७२ जणांची थेट नोकरीसाठी अंतिम निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त दत्ता चव्हाण यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!