थंडी गायब; बागायतदार चिंतेत

रत्नागिरी : अवकाळी पावसाच्या तडाख्यातून सावरलेल्या कोकणातील हापूस आंबा बागायतदारांना मिळालेली ‘गुलाबी थंडी’ची अल्पायुषी साथ आता संपली आहे. गेल्या काही दिवसांपासून अचानक उब वाढल्यामुळे वातावरणात बदल झाला असून मोहोरावर पुन्हा संकट दाटले आहे.
कृषी तज्ञांच्या मते, आंब्याचा उत्तम हंगाम यावा यासाठी सलग २१ दिवस तापमान १४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मात्र रत्नागिरी परिसरात गेल्या दोन–तीन दिवसांपासून थंडी जवळजवळ गायब झाली आहे. दिवसाच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने मोहोर कुजण्याची किंवा किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. थंडीची साथ थांबल्यामुळे झाडांवर नव्याने येणाऱ्या मोहोरावर थेट परिणाम होत असून त्याची वाढ खुंटण्याची किंवा मोहोर गळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जे बागायतदार ‘कल्टार’चा वापर करत नाहीत, त्यांच्या बागांमध्ये डिसेंबर–जानेवारीत नैसर्गिकरित्या मोहोर येण्याची अपेक्षा होती. अनेक बागांमध्ये पालवी फुटलेली असून मोहोराची तयारी सुरू होती. मात्र, थंडी ओसरल्यामुळे नैसर्गिक मोहोर येण्याच्या शक्यता पुन्हा धुसर बनल्या आहेत. त्यामुळे या बागांमध्ये मोहोर टिकेल की नाही, याबद्दल अनिश्चितता वाढली आहे.
अवकाळी पावसानंतर आलेल्या थंडीने दिलासा मिळेल, असा आशावाद होता. पण तीही अचानक कमी झाल्याने बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. गुलाबी थंडी आणखी किमान पंधरा दिवस टिकली असती, तर मोहोर अधिक प्रमाणात फुटण्याची शक्यता होती. आता हवामान विभागाकडून पुन्हा थंडी वाढते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशी प्रतिक्रिया चिंताग्रस्त बागायतदारांकडून मिळत आहे.



