आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यतिथीनिमित्त मानवंदना

रत्नागिरी : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त १७ फेब्रुवारी रोजी राष्ट्र सेविका समिती रत्नागिरीच्या सेविकांनी गणेशगुळे येथील त्यांच्या मूळस्थानी असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमाला तेथील नागरिक उपस्थित होते. सुरवातीला संध्या सप्रे यांनी ‘वंदे भारतम्’ हे संस्कृत गीत सांगितले. त्यानंतर अर्चना वैशंपायन यांनी वासुदेव बळवंत फडके यांची थोडक्यात माहिती तसेच त्यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले. लेखिका रत्नकोंदण प्रमुख सुनेत्रा जोशी यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्यावर आधारीत स्वरचित रचना सादर केली आणि नंतर कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर यांनी सगळ्या ग्रामस्थांचे आभार मानले.
वासुदेव बळवंत फडके यांच्या महान कार्याची आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती नवीन पिढीला, समाजाला समजावी हा यामागील उद्देश होता. ग्रामस्थ महिला आणि पोलीस पाटील संतोष लाड हे कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यकमाचे सूत्रसंचालन वेदिका मुळ्ये यांनी केले. रेणुका प्रतिष्ठान अध्यक्ष दीपा पाटकर तसेच उपाध्यक्ष मृणाल भावे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. नंतर “भारतमाता की जय” म्हणत काही घोषणा दिल्या आणि संपूर्ण वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.



