मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापुरात मालमत्ताधारकांसाठी येत्या वर्षभरात स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार 

नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

राजापूर : शहरातील मालमत्ताधारकांसाठी आगामी वर्षभरात सर्वांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या कामाला गती मिळाली आहे.

या उपक्रमासाठी काही वर्षांपूर्वीच नगराध्यक्षा खलिफे यांनी शासनाकडून सुमारे ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्याच अनुषंगाने सोमवारी (१३ एप्रिल) नगराध्यक्ष दालनात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात नगर विकास विभागासह भूमी अभिलेख खात्याचे शिरस्तेदार शेखर पवार आणि परीक्षण भूमापक रूपेश नागवेकर उपस्थित होते.

 

राजापूर शहरात सुमारे चार हजार मालमत्ताधारक असून, त्यापैकी सध्या सुमारे चारशे मालमत्तांची मोजणी व माहिती संकलन पूर्ण झाले आहे. उर्वरित मालमत्ताधारकांची माहिती गोळा करण्यासाठी विशेष पथक शहरातील नागरिकांच्या घरी भेट देणार आहे. नागरिकांनी अचूक माहिती देऊन या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा खलिफे यांनी केले आहे.

दरम्यान, प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याच्या दृष्टीने माहिती संकलनाचे काम ‘प्रशांत सर्व्हेअर्स, पुणे’ यांना देण्यात आले होते. त्यांनी आपला अहवाल पूर्ण करून भूमी अभिलेख खात्याकडे सादर केला असून, पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे राजापूर शहरातील मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेचे अधिकृत व स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून, मालमत्तेशी संबंधित व्यवहार अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!