मेर्वी, कुर्धे परिसरात वादळी पावसाचा फटका; आंबा-फणस बागांचे मोठे नुकसान

रत्नागिरी : तालुक्यातील मौजे मेर्वी, कुर्धे, बेहेरे आणि मावळंगे या परिसरात शनिवारी सायंकाळी निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळाला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटून त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी संकटामुळे हातातोंडाशी आलेला आंबा आणि फणसाचा घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.
परिसरातील प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र अनंत बेहेरे यांच्यासह अनेक बागायतदारांच्या बागांना या वादळाचा मोठा तडाखा बसला. पावसाचा जोर ओसरल्यानंतर बागांची पाहणी केली असता, झाडावर तयार झालेला आंबा आणि फणस जमिनीवर पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे विदारक दृश्य समोर आले. श्री. बेहेरे यांचा मुलगा प्रसाद याने बागेत जाऊन केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणातून नुकसानीची भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे. ऐन हंगामाच्या काळात निसर्गाने घातलेल्या या घालामुळे बागायतदारांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत शेतकरी हरिश्चंद्र बेहेरे यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली असून, शासनाने तात्काळ या नुकसानीची दखल घेण्याची मागणी केली आहे. केवळ कागदोपत्री पंचनामे न करता, लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बागांमध्ये जाऊन पाहणी करावी किंवा बागायतदारांना विश्वासात घेऊन व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे नुकसानीचा आढावा घ्यावा, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे. आधीच महागाई आणि बदलत्या हवामानाशी झुंज देणाऱ्या कोकणच्या बागायतदाराला आता या अस्मानी संकटानंतर सरकारी मदतीची मोठी प्रतीक्षा लागून राहिली आहे.



