मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अवकाळी पावसाचा राजापूर तालुक्याला तडाखा

७३ घरांचे नुकसान; १७ लाखांहून अधिक हानी, दोघे जखमी

राजापूर : तालुक्यात काल झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले असून अनेक गावांतील घरांचे छप्पर उडाले, झाडे कोसळली तसेच वीजपुरवठाही विस्कळीत झाला. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले असून आतापर्यंत ७३ घरे व गोठ्यांचे सुमारे १७ लाख १९ हजार ४२० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रभारी तहसीलदार श्री. सरफरे यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी सुरू होती. काल मात्र पावसाने कहर करत अनेक गावांना फटका दिला. वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे व कौले उडून गेली. अनेक ठिकाणी झाडे वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीज वितरण व्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले आहे. वीज खांब व तारा तुटल्यामुळे १० ते १२ गावांतील दोन हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

महावितरण विभागाकडून तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून काही गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार वीज वितरण विभागाचे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून पुढील अहवालांमध्ये नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

वादळी वाऱ्यादरम्यान घडलेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. केळवली येथील यशवंत बाबी बेळणेकर हे किरकोळ जखमी झाले असून प्रभारी तहसीलदार श्री. सरफरे यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तर बांदिवडे येथील राकेश तानवडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कुडाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, रविवारी साप्ताहिक सुट्टी असतानाही महसूल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तातडीने फिल्डवर धाव घेतली. तसेच खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी कालपासून सातत्याने कार्यरत आहेत. प्रशासनाच्या या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!