आमदार किरण सामंत यांचा जनता दरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न
राजापूर तालुक्यातून ६३ अर्ज दाखल :अनेक अर्जांवर जाग्यावर निर्णय

राजापूर : लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारातून राजापूर तालुक्याचा जनता दरबार जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. या जनता दरबारात तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या समस्या आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.
जनता दरबारात महसूल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, कृषी, वन विभाग तसेच इतर शासकीय विभागांशी संबंधित विविध विषयांवर नागरिकांनी अर्ज दाखल केले. यावेळी सुमारे ६३ नागरिकांनी आपल्या समस्या व मागण्यांचे अर्ज प्रशासनाकडे सादर केले. विशेष म्हणजे अनेक अर्जांवर जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देत जागेवरच निर्णय घेण्याचे आदेश दिले. काही प्रकरणांमध्ये संबंधित नागरिकांना त्वरित दिलासा मिळाला. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी बोलताना सांगितले की, “जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी जनता दरबारासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात. नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत.”
जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी तालुक्याचे प्रमुख अधिकारी कर्मचारी सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



