मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दोन आंब्यांवरून गोपाळगड किल्ल्यावर वाद; दुर्गप्रेमी संघटना आक्रमक

गुहागर : दोन आंबे उचलल्याच्या कारणावरून गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर पर्यटकांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेनंतर गोपाळगड किल्ल्यावर मालकी हक्क सांगितला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रत्नागिरी जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

गोपाळगड हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला ऐतिहासिक किल्ला आहे. यापूर्वी शासकीय त्रुटींमुळे किल्ल्याच्या मालकी हक्काबाबत वाद निर्माण झाला होता. मात्र न्यायालयीन लढ्यानंतर किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला. त्यामुळे हा किल्ला सर्वसामान्य नागरिक, पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी खुला असल्याचे मानले जाते.

असे असताना पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांशी कथित गैरवर्तन झाल्याचा आरोप समोर आल्याने हे प्रकरण पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. दोन आंबे उचलल्याच्या कारणावरून पर्यटकांना रोखून धरण्यात आल्याची चर्चा होत असून संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या प्रकारानंतर दुर्गप्रेमी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य संरक्षित स्मारकावर कोणाचाही खासगी मालकी हक्क असू शकत नाही. पर्यटकांना दमदाटी करणे अथवा डांबून ठेवण्याचा प्रयत्न करणे गंभीर बाब असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी यांनी केली आहे.

दरम्यान, गोपाळगड किल्ल्याशी संबंधित हा वाद पुन्हा चर्चेत आला असून प्रशासन याप्रकरणी काय भूमिका घेते, याकडे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी संघटना आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!