रत्नागिरीत डाक विभागाची फ्री पिकअप सेवा सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी डाक विभागात नवे पर्व सुरू झाले असून फ्री पिकअप ही सेवा १ जूनपासून सुरू झाली आहे. या सेवेसाठी विशेष वाहन उपलब्ध करून देण्यात असून ते रत्नागिरी शहर तसेच एमआयडीसी परिसरात फिरून ग्राहकांकडून त्यांच्या पार्सल व पत्रांचे संकलन करणार आहे, अशी माहिती डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिली.
ग्राहकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत ही सेवा सुरू झाली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना पोस्ट ऑफिसमध्ये येऊन रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. त्यांचा वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होणार असून व्यावसायिक ग्राहकांना अधिक सुलभ व जलद सेवा मिळणार आहे. ग्राहकांनी बुक नाऊ पे लेटर (BNPL) करार केल्यास अशा प्रकारच्या विशेष सुविधांचा अधिक लाभ घेता येणार आहे. व्यावसायिक ग्राहकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
भारतीय डाक विभाग हे केंद्र सरकारचे १७६ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेले खाते आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारी विश्वासार्ह संस्था म्हणून त्याची ओळख आहे. बदलत्या काळानुसार आणि ग्राहकांच्या अपेक्षांनुसार डाक विभागाने आपल्या सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करत विविध व्यवसायाभिमुख सेवा सुरू केल्या आहेत.
ई-कॉमर्स आणि पार्सल व्यवसायाच्या वाढत्या युगात पोस्ट ऑफिस दरवर्षी लाखो पार्सलची यशस्वी हाताळणी करत आहे. आज पार्सल सेवांच्या क्षेत्रात अनेक खासगी स्पर्धक असले तरी भारतीय डाक विभागाने आपल्या विश्वासार्हता, व्यापक नेटवर्क आणि ग्राहकाभिमुख सेवांच्या जोरावर स्वतंत्र ओळख कायम राखली आहे. रत्नागिरी डाक विभागाच्या या ग्राहकाभिमुख उपक्रमाचे नागरिक व व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. विपणन अधिकारी गजानन करमरकर, रवींद्र घडशी, पोस्टमास्तर रत्नागिरी व हेड पोस्टमन रत्नागिरी प्रधान डाकघर यांनी या सेवेसाठी विशेष मेहनत घेतली आहे.



