ईशान्येकडील नागरिकांना मोफत कायदेविषयक मदत; रत्नागिरीत विशेष कक्षाची स्थापना

रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली) यांच्या निर्देशांनुसार, पूर्वोत्तर (ईशान्येकडील) राज्यांतील विद्यार्थी आणि नागरिकांना मोफत कायदेविषयक मदत, सल्ला व सहाय्य देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे एक विशेष मदत कक्ष (लीगल एड क्लीनिक) सुरू करण्यात आला आहे.
या विशेष कक्षाच्या माध्यमातून अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यांमधून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना त्यांच्या कायदेशीर अडचणींमध्ये मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.
ईशान्येकडील राज्यातील नागरिकांना कोणतीही भाषिक किंवा तांत्रिक अडचण येऊ नये, म्हणून या मदत कक्षामध्ये विशेषत्वाने एक विधी स्वयंसेवक (पॅरा लीगल व्हॉलेंटिअर) आणि एक वकील यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना योग्य तो कायदेशीर सल्ला आणि सहाय्य देईल.
रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने रत्नागिरीत विविध शिक्षण संस्थांमध्ये शिकणारे ईशान्येकडील विद्यार्थी, जिल्ह्यातील आंबा बागांमध्ये काम करणारे मजूर, चिरा खाणींवर (जांभा दगड खाणी) कार्यरत असणारे कामगार, मासेमारी (फिशरीज) व्यवसायात जोडलेले मजूर या घटकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
ही सर्व मदत पूर्णपणे मोफत दिली जाणार असून, ईशान्येकडील राज्यातील जे नागरिक, विद्यार्थी किंवा मजूर सध्या रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्याला आहेत, त्यांनी आपल्या कायदेविषयक अडचणी, तक्रारी किंवा मार्गदर्शनासाठी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, येथील मदत कक्षाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



