मुख्य बातमी

शाळाप्रवेशोत्सव उत्साहात; पालकमंत्री उदय सामंतांसह अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी

रत्नागिरी : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज (१५ जून) उत्साहपूर्ण वातावरणात झाली. शासनाच्या “शाळांना भेटी देणे” या उपक्रमांतर्गत जिल्हाभरातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वितरण तसेच शैक्षणिक जनजागृती कार्यक्रमांनी पहिला शाळेचा दिवस रंगतदार ठरला.

जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनुसार विविध अधिकारी व लोकप्रतिनिधींना शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले होते. उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा परिषद शाळा पाली क्रमांक १ आणि नगर परिषद शाळा क्रमांक १५ (दामले विद्यालय) येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजकल्याण सभापती अॅड. सुयोग कांबळे, शिक्षणाधिकारी शिरभाते मॅडम, गटशिक्षणाधिकारी डुबल, विस्तार अधिकारी सोपनुर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुवारबांव क्रमांक १ येथे भेट देऊन इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी कुवारबांव महालक्ष्मीनगर येथील शाळेला, तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांनी पानवल-होरंबेवाडी येथील शाळेला भेट दिली. जिल्ह्यातील वर्ग १ व वर्ग २ मधील विविध अधिकाऱ्यांनीही शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शाळा प्रवेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी शाळा प्रवेश दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणाची पालखी, बेंजो व वाद्यवृंद, ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. काही ठिकाणी नवागत विद्यार्थ्यांना घोडागाडीतून आणण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच मुलांच्या पावलांचे ठसे घेऊन ते पालकांना स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात आले.

पहिल्याच दिवशी “पुस्तक दिन” साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळांतील सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

जिल्हाभरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या शाळाप्रवेशोत्सवामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!