मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

चिपळूणमध्ये आढळले दुर्मिळ पांढऱ्या रंगाचे मुंगूस 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; वन विभागाकडून संवर्धनाचे आवाहन

चिपळूण : अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मुंगूसाचे शहरात दर्शन झाल्याने वन्यजीवप्रेमींसह नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शहरातील एका अपार्टमेंटच्या टेरेसची स्वच्छता करत असताना एका तरुणाच्या नजरेस इमारतीखालील झाडाझुडपांमध्ये मुक्तपणे वावरणारे हे पांढरे मुंगूस पडले. त्याने या दुर्मिळ प्राण्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

हा व्हिडीओ वन विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचला असून, रत्नागिरी जिल्हा वन विभागीय अधिकारी गिरीजा देसाई-पाटील यांनी नागरिकांना अशा दुर्मिळ वन्यजीवांना कोणताही त्रास देऊ नये, त्यांना पकडण्याचा किंवा त्यांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.

वन विभागाच्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाचे हे मुंगूस बहुतांश वेळा ल्युसिझम (Leucism) या नैसर्गिक आनुवंशिक वैशिष्ट्यामुळे आढळते. या अवस्थेमुळे प्राण्याच्या शरीरातील रंगद्रव्य कमी असल्याने त्याचा रंग पांढरट दिसतो. मात्र अशा प्राण्यांचे डोळे लाल नसतात. त्यामुळे हा पूर्ण अल्बिनो (Albino) नसून, नैसर्गिक रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे त्याचा रंग बदललेला असतो.

या दुर्मिळ वन्यजीवाचे नेमके ठिकाण जाहीर करू नये, असेही वन विभागाने स्पष्ट केले आहे. अशा प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे वावरता यावे आणि त्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंगूस हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो. साप, उंदीर, घुशी तसेच पिकांचे नुकसान करणाऱ्या लहान प्राणी व कीटकांवर नियंत्रण ठेवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच शेतीसाठीही तो अत्यंत उपयुक्त वन्यजीव मानला जातो.

अशा दुर्मिळ वन्यजीवांचे दर्शन झाल्यास त्यांना कोणताही त्रास न देता तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी आणि त्यांच्या संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागाने नागरिकांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!