आर्टिकल

आचंद्रसूर्य स्वतंत्र भारताची वाटचाल आणि शाश्वत परिवर्तनासाठी जाणीवा

“अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे!

ध्वज विजयाचा उंच धरा रे, उंच धरा रे, उंच धरा रे..!!”

भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असल्याने सार्वभौम जनतेच्या आनंदाला उधाण आलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी मांडलेल्या यज्ञात अनेक समिधांची आहुती पडली. यज्ञ सिद्ध झाला; देश स्वतंत्र झाला मात्र त्यातील अंतिम आहुती साक्षात मातृभूमीचीच पडावी हे दुःख अनेक पिढ्या जाऊनही अस्वस्थ करणारे आहे. तरीही स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ साली लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला आणि भारतीय मनाच्या वेदना स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत विरून गेल्या.

पिळवणूक झालेल्या देशाची कमान हातात घेणे ही तशी धाडसाचीच गोष्ट. मात्र हे आव्हान नेहरूंनी हिकमतीने पार पाडले. भारतीय विचारसरणीचा परिपाक राज्यकारभारात आणताना त्यांनी शांतता, सामंजस्य अशी धोरणे आंतरराष्ट्रीय पातळीवर अंमलात आणण्याची किमया साधली. यात चीनने केलेल्या कावेबाजपणामुळे त्यांच्यासह अवघ्या देशाची फसवणूक झाली मात्र पुढे लाल बहादूर शास्त्रींनी ही कसर भरून काढली. याच काळात देशात आर्थिक उन्नती साधण्यासाठी विविध क्षेत्रांत शाश्वत बदल झाले.

महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींनी आपला खमकेपणा दाखवून सैन्याला सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली थोडीशी मोकळीक दिली. तेवढ्यातच बांगलादेश निर्माण झाला त्यामुळे पुढे २० वर्ष केवळ कुरापती काढण्यावरच समाधान मानावे लागले, अणुचाचणी घेऊन त्यांनी भारताला स्वयंसिद्ध केले. त्यापुढे १९९९ ला पाकिस्तानला पुन्हा आपली जागा दाखवून ‘अटल’ बिहारींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नामोहरम केले. पुढे डॉ. मानमोहन सिंह यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आर्थिक मंदिला परतवून लावले. तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली आर्थिक धोरणांना चालना देतानाच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला. वेळोवेळी शत्रूराष्ट्रांना शह दिला तर अनेक आंतरराष्ट्रीय पेचप्रसंगात मैत्री आणि कुटनिती वापरून मार्ग काढला. कोरोना, दुष्काळ व अन्य आपत्ती राज्यसरकरांच्या मदतीने वेळोवेळी दूर करण्यात भारत यशस्वी ठरला.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनतेचं समर्थन वेळोवेळी शासनकर्त्यांना लाभलं ही सकारात्मक बाब नमूद करावीच लागेल. जगभरात भारतीय पसरले असून त्यांच्या कर्तृत्वाचा डंका वाजत आहे. भारताच्या सकारात्मक वाटचालीत परदेशात स्थित भारतीयांचे योगदान मोलाचे आहे. तर आजही शेतकरी हाच देशाचा कणा आहे. मान्य आहे की अस्मानी संकटाने आज शेतकरी गांजला आहे पण ‘फिरुनी नवी जन्मीन मी’ या कवितेतील ओळींप्रमाणे तो नव्याने उभा राहील हा विश्वास आहे. कष्टकरी माणसाच्या श्रमांना आता खऱ्या अर्थाने मोल मिळत आहे. समृद्धीकडे वाटचाल करणारा मध्यमवर्ग आता स्थिर होत आहे.

शिक्षणात भारतीय मागे नाहीत, ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा मंगळाला पार करून ‘L-1’ कक्षेपर्यंत पोचल्या आहेत. गतिमान प्रशासनामुळे सर्वसामान्य व्यक्तीला असामान्यत्व प्राप्त झाले आहे. कला-क्रीडा-संस्कृती यांचा संगम पहायला मिळत आहे. नवकल्पनांना चालना मिळाल्याने स्टार्ट अप नव्या उंचीवर पोहचले आहेत.

मागील ८० वर्षांत भारताने स्वतःला सावरले, स्थिरावले आणि विविध यशांना गवसणी घातली. यात काही नकारात्मक गोष्टी घडल्या खऱ्या; पण ‘वसुधैव कुटुंबकम’चा नारा देणाऱ्या या देशाला अशा गोष्टी टाळण्यासाठी अजून बरीच मजल मारावी लागणार आहे. लोकशाही खमकी असल्याने कोणतं सरकार निवडून द्यायचं हे जनतेच्या हातात आहे, मात्र ‘एकदा सरकार निवडून दिलं की ते भारताचं प्रतिनिधित्व करणारं, जनतेचं सार्वभौम सरकार असतं’ हे भान प्रत्येक नागरिकाने राखायला हवं. तर राजकीय भाष्य करताना त्यावर संवैधानिक लगाम असावा याबाबत सजग राहण्याची आवश्यकता शासनकर्त्यांनी जाणून घ्यायला हवी. प्रशासनाने अधिक तत्पर, कामसू व कनवाळू होण्यासाठी प्रयत्न करावेत. एकूणच प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल करण्यास सुरुवात केली तर देश एका नव्या क्रांतिकारी परिवर्तनाला सामोरा जाईल. हे परिवर्तन स्वातंत्र्यप्रमाणेच चिरंतन काळ टिकेल. जाणीवा निर्माण झाल्या पाहिजेत एवढे एकच मागणे विश्वेश्वराकडे करूया आणि ८० वा स्वातंत्र्यदिवस संस्मरणीय करूया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!