मुख्य बातमी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने आयोजित अभिवाचन स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मराठी अभिवाचन स्पर्धा १६ ऑगस्ट रोजी पटवर्धन हायस्कूलच्या कॅप्टन ठाकूर सभागृहात झाली. उद्घाटन प्रसंगी भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त विनायक हातखंबकर, नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर, स्पर्धेचे परीक्षक संजय बोरकर आणि राजेंद्र कुमार घाग हे उपस्थित होते. दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन करून जेष्ठ रंगकर्मी आणि नाट्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य श्रीकांत पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये एकूण ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तब्बल बारा तास चाललेल्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते पार पडले. बक्षीस वितरण प्रसंगी नगराध्यक्षा श्रीमती सुर्वे यांनी रत्नागिरीतील तमाम रंगकर्मींना आश्वासन दिले की राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या रत्नागिरीतील संघांसाठी नगरपालिकेच्या मालकीचे शहरांमध्ये विविध ठिकाणी जे हॉल किंवा ऍक्टिव्हिटी सेंटर उपलब्ध आहेत ते अल्प दरात रंगकर्मींना उपलब्ध करून देण्यात येतील.

स्पर्धेचा निकाल असा : सांघिक पारितोषिके : प्रथम क्रमांक – कलारंग नाट्य प्रतिष्ठान वरवडे, द्वितीय क्रमांक – अनन्या एंटरटेनमेंट जांभरुण, तृतीय क्रमांक – गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी, उत्तेजनार्थ – श्रद्धा मयेकर आणि टीम.

वैयक्तिक पारितोषिके : प्रथम क्रमांक – सौ. पूजा जोशी, द्वितीय क्रमांक – सौ. मधुरा लाकडे, तृतीय क्रमांक – योगेश चव्हाण, उत्तेजनार्थ – श्रीमती रसिका सहस्रबुद्धे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संपूर्ण कार्यकारिणीने स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. तसेच स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी कार्यकारणीच्या वतीने अनिल दांडेकर, सौ. अनुया बाम, श्रीकांत पाटील आणि ॲड. श्रीकांत भाटवडेकर या टीमने स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याचे सर्व स्पर्धकांनी आवर्जून सांगितले.

स्पर्धेच्या उद्घाटन वेळी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह वामन कदम यांनी सूत्रसंचालन केले तसेच बक्षीस वितरणा वेळेचे सूत्रसंचालन सुनील बेंडखळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!