भाट्ये येथे ७ दिवसीय मधुमक्षिकापालन विषयावर प्रशिक्षण संपन्न

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, तसेच कृषी विभाग, रत्नागिरी व शास्त्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने २६ मार्च ते १ एप्रिल या कालावधीमध्ये सात दिवसीय शास्त्रोक्त मधुमक्षिकापालन या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रत्नागिरी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, अध्यक्ष भाट्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे, तर रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. संतोष वानखेडे, किटकशास्त्रज्ञ यांनी सात दिवसाचे वेळापत्रक तयार करून प्रशिक्षणार्थिना दर दिवशी व्याख्यान दिले आणि प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच महाराष्ट्र राज्यातील नामवंत तज्ञांना ऑनलाइन पद्धतीने व्याखान व मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले.
गुहागर येथील मधपाळ मिलिंद गाडगीळ यांना त्यांचा अनुभव कथन करण्यासाठी पाचारीत केले. डॉ. वानखेडे यांनी उपस्थितांना सातेरी व डंखविरहित मधमाशी वसाहतमधील कामकरी माशी, नर माशी, राणी माशी, राणी घर, परागकण, रॉयल जेली, प्रोपोलीस, मध, मेण आदीबद्दल बद्दल माहिती देतानाच प्रत्यक्ष दाखविले. त्यासोबतच डंखविरहित मधमाशीची वसाहत नैसर्गिक अधिवासातून काढण्याचे तंत्र सांगितले. वसाहतीचे विभाजन कसे करावे, मधपेटीची कशी काळजी घ्यावी, मेणकिडीचे व्यवस्थापन कसे करावे, तसेच पावसाळ्यात वसाहतीची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कोकणात जैवविविधता टिकून राहणेसाठी आणि कोकणातील प्रमुख पिकांचे अधिक उत्पादन वाढविणेसाठी मधमाशीचे संवर्धन व पालन करावे असे आवाहन डॉ. वानखेडे यांनी केले.
समारोपीय कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थिना शिवकुमार सदाफुले, डॉ. किरण मालशे, डॉ. संतोष वानखेडे व विनोद हेगडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्ह्यातील एकूण ३२ व्यक्तींनी प्रशिक्षण पूर्ण केले.
या कार्यक्रमामध्ये समीरकुमार आडाव पाटील, श्री. शिवलकर, श्री. मोंडकर, श्री. आगाशे, श्री. भिडे, श्री. गुरव यांच्यासह लांजा, रत्नागिरी, राजापूर गुहागर, संगमेश्वर, दापोली व खेडमधून शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी समीरकुमार आडाव पाटील, श्री. भिडे, राजन शिवलकर आदींनी मनोगत व्यक्त करून प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे डॉ. वानखेडे व इतर कृषी विभागाचे अधिकारी यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये आणि कृषी विभाग, रत्नागिरी यांचे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी आभार विनोद हेगडे यांनी व्यक्त केले.



