Uncategorized

समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी

मान्सून पूर्व तयारी आढावा २०२५

रत्नागिरी : मान्सूनकाळात नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वय साधून व सतर्क राहून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष एम.देवेंदर सिंह यांनी दिल्या.

मान्सून पूर्व तयारी २०२५ आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी गाळ, दरडप्रवण क्षेत्र, अतिधोकादायक कारखाने, बोट, शोध व बचाव साहित्य, फायर सूट, पोर्टेबल इन्फ्लॅटेबल एलईडी लाईट सिस्टिम, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली, रोप आणि रेस्क्यू किट, पर्जन्यमापक यंत्र, तालुकानिहाय जेसीबींची संख्या, दरडप्रवण गावे, होर्डिंग्ज, धरणांची दुरुस्ती आदीबाबत आढावा घेतला.

ते म्हणाले, “राजापूर, खेड, चिपळूण या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होत असते, त्यामुळे पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक होर्डिंग्ज काढून टाकावेत. अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पुलांची पावसाळ्यापूर्वी पाहणी करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग यांनी सर्व प्रमुख घाटात मान्सून कालावधीपर्यंत जेसीबी, पोकलेन, डंपरची व्यवस्था कायमस्वरुपी करावी. आरोग्य विभागाने पावसाळ्यात साथीचे रोगांचा प्रसार होवू नये म्हणून उपाययोजना करावी.”

पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी नदीमधील काढलेला गाळ किनाऱ्यावर साठवून न ठेवता त्याबाबत योग्य कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरण करून मान्सून पूर्व तयारी व आपत्ती निवारण याबाबतची माहिती दिली.

यावेळी सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!