आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२५मध्ये सहभागाची अंतिम मुदत ३१ जुलै

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)’ अंतर्गत खरीप हंगाम २०२५ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा पीक विमा काढावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

योजनेत सहभागासाठी ॲग्रीस्टॅक (AGRISTACK) शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असून पीक विमा नुकसानीसाठी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळाकरीता भात व नाचणी पिकांसाठी ही योजना लागू आहे. सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. कुळाने आणि भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरी देखील या योजनेत भाग घेऊ शकतात; परंतु त्यांना नोंदणीकृत भाडेकरार पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. खरीप हंगामासाठी २ टक्के, जोखीमस्तर अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के शेतकरी विमा हप्ता आहे.

पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना बंधनकारक नाही. त्यांना योजनेत सहभाग घ्यायचा नसल्यास अंतिम दिनांकापासून ७ दिवसांच्या आत बँकेस विमा हप्ता न भरण्याबाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा. भरलेली पोहोच पावती जपून ठेवावी. कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) आपले सरकारच्या मदतीने या योजनेत सहभाग घेवू शकतात. अधिक माहिती pmfby.gov.in या पोर्टलवर उपलब्ध आहे.

या योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामातील पिकांपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या उत्पादनात विपरीत परिणाम झाल्यास इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादन आधारे, महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत शेतात घट गृहीत धरून नुकसान भरपाई दिली जाईल.

शेतकऱ्याने लावलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणीमध्ये करावी. विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. योजनेत खरीप हंगामात भात आणि नाचणी ही पिके समाविष्ट आहेत. नियुक्त केलेली कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई असून त्यांचा ईमेल आयडी pikvima@aicofindia.com हा आहे. विमा हप्त्यामध्ये शेतकरी हिस्सा भातासाठी 457.50 रुपये तर नाचणीसाठी 87.50 रुपये आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!