मुख्य बातमी

रत्नागिरीत पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी १ हजार १०३ उमेदवार रिंगणात

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदांसाठीची शारीरिक चाचणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष लेखी परीक्षेकडे लागले आहे. ही लेखी परीक्षा रविवारी (१५ मार्च) सकाळी ११ वाजता रत्नागिरी शहरातील दोन केंद्रांवर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या खडतर शारीरिक चाचणीतून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये ७८६ पुरुष उमेदवार तर ३१७ महिला उमेदवार असे एकूण १ हजार १०३ उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

रत्नागिरी शहरातील दोन महत्त्वाच्या केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. यामध्ये फिनोलेक्स कॉलेज (एमआयडीसी मिरजोळे) आणि श्री. शामराव पेजे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (थिबा पॅलेस) या दोन परीक्षा केंद्रांवर ही लेखी परीक्षा होणार आहे.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे. परीक्षा अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त आणि नियोजन केले आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व तरुण-तरुणींना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!