आमच्या ज्ञानाच्या उपयोगाने शेतकऱ्यांनी हळद लागवडीत प्रगती करावी : सचिन कारेकर
आबलोली येथे एसके-4 ग्रुपतर्फे हळद लागवड प्रशिक्षण

गुहागर : आम्ही २०-२५ वर्षांत हळद लागवडीखाली जे अनुभव व ज्ञान मिळवले आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून इतर शेतकऱ्यांनी हळद लागवडीत प्रगती करावी. आम्ही आपणांस संपूर्ण मार्गदर्शन मोकळेपणाने आणि सातत्याने करत राहू,” असे आवाहन राष्ट्रपतींच्या हस्ते नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त एसके-4 हळदीच्या वाणाचे प्रणेते सचिन कारेकर यांनी केले.
दरवर्षीप्रमाणे एसके-4 ग्रुपतर्फे आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात हळद लागवड ते प्रकिया याविषयावर आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. कारेकर पुढे म्हणाले, आम्ही आयुष्यातील २५ वर्षे खर्ची करून एसके-4 ही हळदीची जात तसेच कोकणातील परिस्थितीत हळद लागवडीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आज हे ‘रेडिमेड’ तंत्रज्ञान आपल्यासमोर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मांडतोय. या ज्ञानाचा उपयोग अवश्य करून आपली प्रगती करावी.”
“हळद लागवडीला पावसाळ्यानंतर जानेवारी महिन्यापर्यंत पाणी देणे आवश्यक असल्याचे सांगून जर हे शक्य झाले तरच चांगल्याप्रकारे उत्पादन आपण काढू शकतो. नाहीतर उत्पादनावर परिणाम होतो,” असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. पाण्यात विरघळणाऱ्या रासायनिक खताचा तसेच जीवामृताच्या वापराने हळदीचा गड्डा पोसण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.

या प्रशिक्षणात सचिन कारेकर यांनी हळद लागवडीसाठी बियाणे निवड, बियाणे साठवणूक, हळद लागवड, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर, कीड-रोग नियंत्रण, हळद लागवडीला पावसानंतर चे पाणी व्यवस्थापन, हळद काढणी, कापणीनंतर प्रक्रिया या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी हळद लागवड, हळद उजळणी, हळद पॉलिश करणे याबाबत प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
पंचायत समितीचे माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी ओल्या हळकुंडापासून रोपे तयार करण्याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाला रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतून शेतकरी उपस्थित होते. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थींनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.



