Uncategorized

शिळ ग्रामदेवता नवलादेवी मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण सोहळा उत्साहात

राजापूर : शहरानजीकच्या मौजे शिळ गावची ग्रामदेवता श्री नवलादेवी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिर कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात आणि धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडला. सोमवार ते बुधवार असे तीन दिवस चालेल्या या सोहळ्याला शेकडो भाविकांनी हजेरी लावत श्री नवलादेवी मातेचा जयघोष करत मातेचे दर्शन घेतले.

प. पू. गगनगिरी महाराज मठ कोंडीवळेचे मठाधिपती प. पू. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते कळशारोहण तर ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषात झालेल्या या सोहळ्याचा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची संधी यानिमित्ताने पाहण्याचे भाग्य लाभल्याची भावना शिळ ग्रामस्थांनी व्यक्त केली.

शिळ गावची ग्रामदेवत श्री नवलादेवी मातेचे भव्य दिव्य असे मंदिर उभारण्याचा सोडलेला संकल्प आणि पाहिलेले स्वप्न साकार झाल्याने समस्त शिळवासीयांचा आनंद ओसंडून वाहत होता. पहिल्या दिवशी श्री नवलादेवी मातेची राजापूर शहर ते शिळ मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक, दुसऱ्या दिवशी मंदिरात पार पडलेले विविध धार्मिक विधी आणि शेवटच्या दिवशी कलशारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, श्री सत्यनारायण महापूजा अशा धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.

सोहळ्याला सोमवारी नूतन मूर्ती आगमन मिरवणुकीने शानदार प्रारंभ झाला. मंगळवारी मंदार दीक्षित, नाना जोशी यांच्या नेतृत्वाखाली अमोल हर्डीकर, मकरंद ओळकर, अमित प. देसाई, दिलीप बोरवणकर, अक्षय शेंबवणेकर आदी ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषात प्रायश्‍चित्य, पुण्याहवाचन, वास्तूशांती, होमहवन, मंडप देवता स्थापन, पूजन जलाधिवास, धान्याधीवास, शय्यावास असे विधी पार पडले. दुपारी महाप्रसाद बुवा केदार कदम, उपळे यांचे संगीत भजन कार्यक्रम पार पडले. धार्मिक विधींचे यजमानपद श्री. व सौ. काशिनाथ गोंडाळ यांनी भूषविले.

बुधवारी प. पू. उल्हासगिरी महाराज यांचे हस्ते जीर्णोद्धारीत मंदिरावर कळशारोहण करण्यात आले. तत्पूर्वी विधीवत कलश पूजन झाले. त्यानंतर मुख्य देवता होम हवन, सर्व देवता स्थापन व प्राणप्रतिष्ठा, पूर्णाहूती, बलिदान, महाआरती, महाप्रसाद, श्री सत्यनारायण महापूजा, वारकरी सांप्रदाय मंडळाचा हरिपाठ देणगीदार व मान्यवरांचा सत्कार सोहळा, तर रात्री पालखी सोहळा व महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली. त्यांनतर समर्थकृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हे महाराष्ट्रात गाजलेले विनोदी लोकनाट्य सादर करण्यात आले.

यावेळी श्री नवलादेवी मातेची मूर्ती साकारणारे मूर्तिकार भार्गव व नागवर्धन गुडीगर तसेच मंदिर निर्माणासाठी सहकार्य करणारे आर्किटेक्टर जगदीश पवार, ठेकेदार विजय प्रसाद तसेच संजय कुंदेकर, पेंटर संतोष कुडकर, मुखवटे पॉलिश करणारे सुवर्णकार अविनाश पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला. या मंदिर निर्माणासाठी स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थांनी श्रमदान व आर्थिक योगदान दिले. तर अनेक दानशुरांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून भव्य वास्तू उभी राहिली. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

तीन दिवस अत्यंत मंगलमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. दशक्रोशीतील शेकडो भाविकांनी उपस्थीत राहुन दर्शनाचा व तिर्थ प्रसादाचा लाभ घेतला. सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्री नवलादेवी मंदिर नुतनीकरण समिती ग्रामीण / मुंबई व श्री नवलादेवी परिवारातील सर्वच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!