आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे सलग तिसऱ्या वर्षी ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन’ महोत्सव

५ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान चिपळुणात आयोजन

चिपळूण : वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन’ या कृषी महोत्सवाला सलग दोन वर्षे मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता सलग तिसऱ्या वर्षी हे भव्य प्रदर्शन ५ ते ९ जानेवारी या कालावधीत चिपळूण शहरात आयोजित केले आहे. बहाद्दरशेख नाका येथील चिपळूण नगरपालिकेचे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदान येथे होणाऱ्या या कृषी महोत्सवाची माहिती वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या या कृषी महोत्सवामुळे चिपळूण ‘कोकण कृषीची पंढरी’ म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोकणात दुग्ध व्यवसाय यशस्वी होत नाही, अशी नकारात्मक धारणा अनेक वर्षांपासून होती. मात्र, या समजुतीला छेद देत मे. वाशिष्ठी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या अत्याधुनिक दुग्ध प्रकल्पाने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. परिपूर्ण नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर हा प्रकल्प यशस्वीपणे वाटचाल करत असून कोकणातील दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देत आहे.

कोकणातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे तसेच स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे या उद्देशाने स्टेट बँक ऑफ इंडिया, बहाद्दरशेख नाका शाखेच्या अर्थसहाय्याने वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ७ सप्टेंबर २०२१ रोजी चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूणचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. नियोजनबद्ध कामामुळे अल्पावधीतच हा अत्याधुनिक प्रकल्प उभा राहिला. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने तसेच राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रत्यक्षपणे या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

कोकणात यापूर्वी उभारण्यात आलेले काही दुग्ध प्रकल्प विविध कारणांमुळे अपयशी ठरले होते. त्यामुळे दुग्ध व्यवसायाबाबत नकारात्मक मानसिकता निर्माण झाली होती. ही मानसिकता बदलून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणेच कोकणातील शेतकरीही सक्षम व्हावेत, असे स्वप्न सुभाष चव्हाण यांनी पाहिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिष्ठी डेअरी प्रकल्प साकार झाला. आज या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांसह अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून सलग दोन वर्षे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पहिल्या वर्षी तीन दिवसांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, तर शेतकरी व कृषीप्रेमींच्या मागणीनुसार गतवर्षी हे प्रदर्शन पाच दिवसांचे करण्यात आले. कोकणातील हा पहिलाच असा कृषी महोत्सव असून लाखो शेतकरी व नागरिकांनी याला भेट दिली. यंदाही हे प्रदर्शन पाच दिवस चालणार असून यावर्षीही त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विश्वास प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी व्यक्त केला आहे.

वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शनात १०० पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग, पशुपक्षी व प्राणी प्रदर्शन, चर्चासत्रांसाठी स्वतंत्र कक्ष, मोफत फॅब्रिकेटेड स्टॉल्स, आधुनिक कृषी अवजारे, मान्यवरांचे मार्गदर्शन, पिलरलेस दोन भव्य शामियाने, परदेशी भाजीपाला तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

दरम्यान, ५ ते ९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शनाच्या सभा मंडपासह अन्य कामांचा शुभारंभ वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना प्रशांत यादव म्हणाले की, वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन हे केवळ स्टॉल्सचे प्रदर्शन नसून, शेतीविषयक विचारांचे व्यासपीठ, अनुभवांची देवाणघेवाण आणि कोकणातील कृषी व्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा एक सशक्त पूल आहे. यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!