वणंद (दापोली) येथील ४८ वर्षीय इसम वाहून गेल्याने बेपत्ता
शोधकार्यात पावसाचा आणि नदीच्या मोठ्या प्रवाहाचा अडथळा

दापोली : तालुक्यात सकाळी नऊच्या सुमारास ड्युटीवर चाललेला ४८ वर्षीय इसम नदीत सायकलसकट वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज (२६ मे) सकाळी घडली आहे. राजेंद्र सोनू कोळंबे (४८) असे या बेपत्ता इसमाचे नाव आहे. राजेंद्र कोळंबे यांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, पावसामुळे या शोधकार्यात अडथळे येत आहेत. नदीच्या पूलाला कोणतेही संरक्षण कठडे नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे तालुक्यातील वणंद येथील कोळंबे कुटुंबावर चिंतेत पडले आहे.

दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीला पूर आल्याने कोंडीच्या पुलावरून राजेंद्र कोळंबे वाहून गेले. सकाळी घरातून ड्युटीवर परत जात असताना नदीच्या मोठ्या प्रवाहात ते वाहून गेल्याने कुटुंबासमोर दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे. दापोली पोलिस प्रशासन, महसूल विभाग, गावकरी नदीपात्रात शोध घेत आहेत. दुपारच्या सुमारास राजेंद्र यांची वाहून गेलेली सायकल मिळाली आहे.


राजेंद्र कोळंबे यांच्या पत्नी व मुले हे कुटुंब गव्ह येथील सासुरवाडीला जाऊन आजच घरी परतले होते. घरी येऊन पुन्हा डबा घेऊन ते नेहमीप्रमाणेच सायकल घेऊन कामावर निघाले होते. याचवेळी नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने ते सायकलसह वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नदीच्या पुलाला संरक्षक कठडे नसल्याने या घटनेत राजेंद्र यांना कोणताही आधार मिळू शकला नाही. याचवेळी नळपाणी योजनेच्या पाईपचे काम करण्यासाठी या पुलाजवळ गेलेल्या गावातील विनोद कांगणे व बंटी चौगले यांच्या हा प्रकार लक्षात आला. या दोघांनीही प्रसंगावधान राखून या घटनेची माहिती तात्काळ गावकरी व प्रशासनाला दिली. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ व महसूल प्रशासनाकडून तात्काळ घटनास्थळी भेट देऊन शोध कार्य सुरू केले. दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे व पोलिस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी घटनास्थळी भेट दिली व मदत कार्यासाठी आवश्यकता सूचना दिल्या; मात्र नदीला असलेल्या मोठ्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.
हातावर पोट असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
हातावर पोट असलेल्या या कुटुंबावर आपल्या घरचा कर्ता पुरुषच बेपत्ता झाल्याने दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आपले बाबा परत येतील सुखरूप परत येतील, त्यांचं काय झालं असेल या विचारानेच कोळंबे यांची पत्नी व त्यांच्या दोन्ही मुलांचा आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा टाकणार होता. बेपत्ता झालेले राजेंद्र यांची मुलगी प्रज्ञा ही नुकतीच बारावी पास झाली असून तिने ८४ टक्के गुण मिळवले होते, तर छोटा भाऊ इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत आहे. प्रज्ञा हिने जिद्दीने परिस्थितीवर मात करून मिळवलेल्या यशाच्या आनंदात कुटुंब असतानाच हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. राजेंद्र हे दापोली एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत सिक्युरिटी गार्ड म्हणून सेवेत आहेत. याच ड्युटीवर जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. शोधकार्यासाठी दापोली येथील माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यासह वणंद येथील स्थानिक ग्रामस्थ व युवक शर्थीचे प्रयत्न करत आहेत; मात्र सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शोध कार्यात अडथळा येत आहे. मंगळवारी सकाळी पुन्हा हे शोध कार्य सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील नद्याही पहिल्याच पावसात दुथडी भरून वाहत असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे.



