रत्नागिरीत शनिवारी तिरंगा रॅली
स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांचे आवाहन

रत्नागिरी : पहेलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतील देशातील सैन्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ शनिवारी (१७ मे) सायंकाळी ५.३० वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ मार्गावर तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.
या रॅलीच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज (१५ मे) बैठक झाली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, “एकता दाखवून देण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिक यांची ही रॅली आहे. सायंकाळी ५.३० वाजता सर्वांनी मारुती मंदिर येथे उपस्थित रहावे. मारुती मंदिर सर्कलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा प्रारंभ होणार आहे. जयस्तंभ येथे पुष्पचक्र अर्पण करून रॅलीची सांगता होईल.”
रॅलीच्या नियोजनासंदर्भात विविध विभागांनी करावयाच्या कामकाजाबाबत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. विविध शासकीय विभागांचे अधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.



