मुख्य बातमी

रत्नागिरीत विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

रत्नागिरी : शहरासह परिसरात दुपारनंतर परतीच्या पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवली.

आज दिवसभर पावसाळी वातावरण होते. तीन वाजेपर्यंत कडाक्याचे ऊन होते; मात्र त्यानंतर हळूहळू वातावरणात बदल होऊ लागला आणि मळभ पसरली. सायंकाळी पाच वाजल्यानंतर ढगांचा गडगडाट चालू झाला आणि काही वेळानंतर विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दिवसभर वातावरण उष्ण होते; मात्र सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली आणि वातावरणात गारवा पसरला.

दरम्यान, ढगांचा गडगडाट सुरू झाल्यानंतर वीज गायब झाली. त्यातच आज लक्ष्मीपूजन असल्याने सायंकाळी वीज गेल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांचीही गैरसोय झाली. अनेकांनी अंधारातच लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत लक्ष्मीची आराधना केली आणि पूजेनंतर फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे एकीकडे अंधारात चमकणाऱ्या विजा आणि दुसरीकडे आकाशात फटाक्यांची आकर्षक आतषबाजी असे चित्र पाहायला मिळाले.

सध्या भात कापणीला वेग आला असून, दिवसभर शेतात भात कापणीची कामे, तर काही ठिकाणी भात झोडणीची कामे सुरू आहेत; मात्र परतीच्या पावसामुळे कापून सुकत घातलेल्या भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पावसाची चिन्हे दिसल्यानंतर भात झोडणीचे कामही शेतकऱ्यांनी उरकते घेतले.

दरम्यान, आज झालेल्या परतीच्या पावसामुळे सायंकाळी ७ वाजेपर्यंत तरी कुठेही नुकसान झाल्याची नोंद नव्हती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!