स्वतःच्या आयुष्याचा रखरखीत उन्हाळा पिऊन राजमाता अहिल्याबाईंनी समाजासाठी काम केलं
'ऑफ्रोह' विभागीय महिला मेळाव्यात डाॅ. आम्रपाली कोकरे यांचे गौरवोद्गार

रत्नागिरी : “राजमाता अहिल्याबाई होळकर या असं व्यक्तिमत्त्व की स्वतःच्या आयुष्याचा रखरखीत उन्हाळा पिऊन त्यांनी समाजासाठी काम केलं. अहिल्याबाई यांच्या वाट्याला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे आहेत तोपर्यंत अहिल्याबाई आमच्या हृदयात राहतील,” असे गौरवोद्गार काढत अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील विविध पैलू “मल्हार युग’ या पुस्तकाच्या लेखिका डाॅ. प्रा. आम्रपाली कोकरे यांनी उघड केले.
ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) शाखा सातारा व ऑफ्रोह महिला आघाडीच्या वतीने नुकताच सुरभी मंगल कार्यालय येथे विभागीय महिला मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या प्रसंगी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.

या कार्यक्रमात अन्यायग्रस्त आदिवासींच्या नेत्या व दारूबंदी आंदोलनाच्या सामाजिक कार्यकर्त्या गितांजली कोळी, ऑफ्रोहचे कायदे सल्लागार मनोज जुनोनकर, ऑफ्रोहचे मार्गदर्शक सुधाकर सुसलादी, ऑफ्रोह महिला आघाडीच्या उपाध्यक्ष भारती धुमाळ, ऑफ्रोहचे राज्य प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर, कोल्हापूर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता गोलाईत, कुंदा सोनपरोते, रत्नागिरी ऑफ्रोह जिल्हाध्यक्ष किशोर रोडे, सांगली ऑफ्रोह जिल्हाध्यक्ष संजय कोळी, पुणे ऑफ्रोह जिल्हाध्यक्ष राजेंद्र बेसके, ऑफ्रोह रत्नागिरी उपाध्यक्ष नंदा राणे यांच्यासह महिला आघाडी व ऑफ्रोहचे अन्य मान्यवर उपस्थित होते. विभागीय महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ऑफ्रोह सातारा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अंजली बेसके, तर सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी तानाजी धुमाळ होते.
अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या, TRTI व आदिवासी विकास विभागांच्या अन्यायकारक भूमिकेविरूद्ध १० डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्च्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजबांधवांनी उपस्थित राहून सरकारला जाग आणून व आपले ह्क्क व अधिकार मिळवू या, असे आवाहन अन्यायग्रस्त आदिवासींच्या नेत्या गितांजली कोळी यांनी केले.
ऑफ्रोहचे मार्गदर्शक सुधाकर सुसलादी यांनी ऑफ्रोह संघटनेला तुळशीवृंदावनाची उपमा देत ऑफ्रोहच्या चळवळीमुळे १४ डिसेंबर २०२२ चा जीआर निघाला आणि त्यामुळेच अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्याचे गौरवोद्गार काढले.

ऑफ्रोहचे कायदेसल्लागार मनोज जुनोनकर यांनी महिला मेळाव्याला सामान्य कुटुंबातील महिलांच्या कर्तृत्वाचा व विकासाचा आलेख पीपीटीच्या मांडून महिलांना प्रोत्साहीत केले. तर सर्वसाधारण सभेत ऑफ्रोहच्या लढ्यातील विविध कायदेशीर बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी ऑफ्रोह महिलाआघाडीच्या उपाध्यक्ष भारती धुमाळ यांनी गितांजली कोळी यांच्या अन्यायग्रस्त आदिवासींच्या लढ्याचा व दारूबंदी आंदोलनातून गितांजली कर्तृत्वाचा लेखाजोखा मांडून श्रीमती कोळी यांना सन्मानपत्र देवून सन्मानित केले.
ऑफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. सूत्रसंचालन राणी जाधव यांनी केले.
या कार्यक्रमासाठी ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष तानाजी धुमाळ, सचिव वनदेव ठिगळे, उपाध्यक्ष मच्छिंद्रनाथ माने, श्री. बेसके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अंजली बेसके, सचिव उषा कुंभारे, उषा नगरधने व इतर ऑफ्रोहच्या सभासदांनी परिश्रम घेतले.


