मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत भाजपचे ‘सच्चे १३’ कार्यकर्ते अपक्ष म्हणून उभे

रत्नागिरी : नगरपालिका निवडणुकीत शहरात राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलवून टाकणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) प्रामाणिक, एकनिष्ठ आणि अनेक वर्षे आपल्या प्रभागात चांगला संपर्क निर्माण करणारे १३ सच्चे कार्यकर्ते पक्षाची तिकिटे न मिळाल्याने किंवा कार्याची दखल न घेतल्याने अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. या अनपेक्षित निर्णयामुळे संपूर्ण राजकीय वातावरणात ढवळून निघाले आहे.

या १३ कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी बूथ पातळीपासून मोठमोठ्या प्रचार मोहिमांपर्यंत कष्ट केले. जनसंपर्क, संघटना बांधणी आणि शहरातील विकास मुद्द्यांवर सातत्याने काम केल्याने त्यांची ओळख खऱ्या अर्थाने भाजपचे सच्चे सैनिक अशी आहे. मात्र, नामांकन प्रक्रियेत दुर्लक्ष झाल्याने किंवा काही परिसरांत वाढलेल्या गटबाजीमुळे त्यांनी यंदा अपक्ष म्हणून ताकदीने उभे राहण्याचा निर्णय घेतला.

रत्नागिरीतील सर्वच पक्षांचे गणित बिघडले असून, स्थानिक स्तरावर तर ‘या १३ जणांमुळे निवडणुकीचा संपूर्ण खेळच बदलणार’ अशी चर्चा रंगत आहे. विशेष म्हणजे, या कार्यकर्त्यांच्या प्रभावाखालील प्रभागांमध्ये इतर पक्षांच्या उमेदवारांना प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. खरा कार्यकर्ता मतदाराशी जोडलेला असतो; त्याची ताकद बूथवर दिसते, असे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः घाम फुटण्याची वेळ आली आहे.

शहरातील विविध भागांत त्यांच्या उमेदवारीनंतर प्रभागनिहाय सरळसरळ लढतीऐवजी त्रिकोणी, तर काही ठिकाणी चौरंगी सामना निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पारंपरिक मतदारवर्ग विभागला जाऊ शकतो, ज्याचा थेट फटका पक्षीय उमेदवारांना बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

या घडामोडींमुळे रत्नागिरी नगरपालिका निवडणूक अधिकच रंगतदार व चुरशीची बनली आहे. आता या ‘सच्च्या १३ अपक्षांची’ ताकद मतपेटीत कशी उमटते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!