Uncategorized

भाजपमध्ये ‘आयात उमेदवारां’मुळे जुन्या कार्यकर्त्यांचा उद्रेक

नीलेश आखाडे, प्राजक्ता रूमडे यांची पत्रकार परिषदेत कैफियत

रत्नागिरी : नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याच्या निषेधार्थ भाजपा ओबीसी महिला माजी जिल्हाध्यक्ष व बेटी बचाव, बेटी पढावच्या जिल्हा समन्वयक प्राजक्ता रूमडे तसेच रत्नागिरी शहर चिटणीस नीलेश आखाडे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना नीलेश आखाडे म्हणाले, “आम्ही घराघरात गेलेलो, पक्षासाठी संघर्ष केलेला, पण निर्णयात आमची गणतीच नाही. प्रभाग क्रमांक सहा हा स्थानिक कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे जपलेला मतदारसंघ असून, बाहेरून आणलेल्या उमेदवारांमुळे पक्षाच्या जनाधारावरच प्रश्नचिन्ह उभे राहू शकते.”

भाजपचे जुने, प्रामाणिक आणि जनसंपर्कात पुढे असलेले कार्यकर्ते नीलेश आखाडे आणि प्राजक्ता रूमडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. दोघांनीही पक्षाने स्वतःच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचे सांगत हा निर्णय अपरिपक्व आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर घाव घालणारा असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

गेली काही वर्षे भाजपचे युवा कार्यकर्ते भाजप वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित होते. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला किमान १२ ते १५ जागा मिळतील, अशी अपेक्षा असताना फक्त महायुतीत भाजपला केवळ सहा जागा दिल्या असून, युवा कार्यकर्त्यांना स्थान दिलेले नाही. यामुळे सामान्य कार्यकर्ते नाराज झाले असून आपण आपल्या पदाचे राजीनामा देवून अपक्ष लढवत असल्याची घोषणा या दोन्ही कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केली केली.

दरम्यान, ‘निष्ठावंतांची उपेक्षा आणि बाहेरच्यांचा सन्मान’ असे चित्र पक्षात दिसत असून, पक्ष नेतृत्वाने हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी स्थिती दिसत आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, प्रभागातील स्थानिक नेतृत्वाचा आदर राखावा आणि घेतलेले निर्णय त्वरित पुनर्विचारात घ्यावेत, अशी अपेक्षाही नाराज कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये ‘आयात उमेदवारां’चा मुद्दा आता भाजपसाठी तणावाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पुढे पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!