जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी दिलेल्या तारखांना जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन

रत्नागिरी : जे विद्यार्थी निट, सीईटी, जेईई परीक्षा दिल्यानंतरही अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी तातडीने अर्ज दाखल करावा. तसेच, ज्यांनी अर्ज सादर केला मात्र, अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही किंवा प्रकरणात त्रुटी आहे, त्यांनी १२ व १३ जून, तसेच १७ व १८ जून रोजी समिती कार्यालयात व्यक्तीश: अथवा पालकांमार्फत संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त रवींद्र कदम यांनी केले आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी कार्यालयाकडे शैक्षणिक प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त होत असून, विशेषतः १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय, इंजिनिअरिंग व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना NEET, CET, JEE आदी परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांनंतर महाविद्यालयात प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य असते; मात्र अनेक विद्यार्थी व पालक याबाबत वेळेत दक्षता घेत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणींना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. असे प्रसंग टाळण्यासाठी समिती कार्यालयामार्फत जनजागृती करण्यात येते. शाळा व महाविद्यालयांमध्ये जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात येतात. महाविद्यालयामध्ये जाऊन प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जातात.



