आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेश प्रक्रिया जाहीर

रत्नागिरी : राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व शिवछत्रपती क्रीडापीठ यांच्याअंतर्गत सन २०२६-२७ साठी विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज २३ एप्रिलपर्यंत येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मिरजोळे एमआयडीसी येथे प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे सादर करावेत. या संधीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केला आहे.

राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद व गडचिरोली या ९ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत असून, या प्रबोधिनींमध्ये निवासी व अनिवासी अशा दोन्ही प्रकारच्या प्रवेशांची सुविधा उपलब्ध आहे. सरळ प्रवेश (५० टक्के) व खेळनिहाय कौशल्य चाचणी (५० टक्के) या पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या प्रबोधिनींमध्ये ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शूटिंग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हँडबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग व बॉक्सिंग अशा १६ क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्यस्तरावर पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेल्या (१९ वर्षांखालील) खेळाडूंना सरळ प्रवेश दिला जाणार असून, इतर पात्र खेळाडूंसाठी कौशल्य चाचणी घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. तसेच, खेलो इंडिया निपुणता केंद्र, पुणे येथे अॕथलेटिक्स, सायकलिंग व शूटिंगसाठी विशेष चाचणी होणार आहे.

सरळ प्रवेश चाचणी २७ व २८ एप्रिल रोजी, तर कौशल्य चाचणी २९ व ३० एप्रिल रोजी होणार आहे. चाचणीत पात्र ठरलेल्या खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करून अंतिम निवड केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!