आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

रत्नागिरीत पहाटे गडगडाट आणि कडकडाटासह पावसाची हजेरी

आंबा बागायतदारांसह मच्छीमारांवरही चिंतेचे सावट

रत्नागिरी : जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी तसेच आज पहाटेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. २ एप्रिल रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू  बागायतदारांमध्ये चिंतेचे सावट असून, मच्छिमारदेखील संकटात सापडण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यापासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होऊ लागले आहेत.

मार्चपूर्वीच तापमानाचा पारा पहिल्यांदाच ३८ अंश सेल्सिअसवर गेला होता. त्यानंतर पुन्हा सकाळी आणि रात्री गारवा तर मध्येच मळभ आणि अधूनमधून पावसाचा शिडकावा असे वातावरणात झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे या वातावरणामुळे सर्दी, ताप, घशाचे संसर्ग, पित्त आदी आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. रायगडात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल की काय, असे वाटत होते. त्याप्रमाणे मंगळवार आणि आज (बुधवार) अवकाळी पावसाने हजेरी लावली.

जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आठवडाभर वातावरणही ढगाळ राहणार आहे. त्यामुळे उकाड्यातही कमालीची वाढ झाली आहे. वार्‍याचा जोर असल्याने मासेमारीदेखील अडचणीत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मच्छिमारांसमोर संकट उभे राहिले असून, वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे आंबा बागायतदारही धास्तावले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!