मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

शासनाच्या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी आंबा-काजू नुकसानीचे सरसकट पंचनामे करा : महेश नाटेकर

राजापूर : सातत्याने प्रतिकूल राहणारे हवामान, अवकाळी पाऊस तसेच अन्य विविध कारणांमुळे यावर्षी आंबा-काजू उत्पादनात मोठी घट झाली आहे. सरासरी २० ते २५ टक्केच उत्पादन झाल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाच्या नुकसानभरपाईपासून एकही शेतकरी किंवा बागायतदार वंचित राहू नये यासाठी नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीचे सभापती महेश नाटेकर यांनी प्रशासनाला दिल्या.

पंचायत समितीच्या किसानभवन सभागृहात कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीचे सभापती महेश नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती नंदीनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक नागले, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, उमेश पराडकर, राजेश गुरव, पंढरीनाथ मयेकर, जान्हवी गावकर, भाग्यश्री लाड यांच्यासह कृषी, पशुसंवर्धन, महावितरण, ग्रामपंचायत आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावर्षी हापूस आंबा आणि काजू हंगामासाठी प्रतिकूल वातावरण राहिल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करत बाधित क्षेत्रांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

बैठकीत तालुक्यात सुरू असलेल्या पंचनामा कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे आणि कृषी अधिकारी विद्या पाटील यांनी सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संयुक्त पथकाकडून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती दिली. सुट्टीच्या दिवशीही पंचनामे सुरू असून काम अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यावेळी सभापती महेश नाटेकर यांनी राजापूर तालुक्यात सुरू असलेल्या पंचनामा कामाबद्दल प्रशासनाचे विशेष कौतुक केले. शासनाच्या नुकसानभरपाईपासून कोणताही शेतकरी वा बागायतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!