मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पांगरे येथे रानवेलींच्या आधाराने वाचले सात भाविकांचे प्राण; कार दरीच्या उंबरठ्यावर अडकली

राजापूर : तालुक्यातील पांगरे येथे शनिवारी घडलेल्या एका थरारक घटनेत पुणे येथून दर्शनासाठी आलेल्या सात भाविकांचे प्राण अक्षरशः थोडक्यात बचावले. त्यांच्या चारचाकी वाहनाने तब्बल ५० फूट खोल दरीच्या दिशेने घसरत जात असताना दाट रानवेली व झुडपांमध्ये अडकून राहिल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील सात भाविक पांगरे येथील स्वामी शिवानंद टेबे महाराज मठात दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी समाधीस्थळालाही भेट दिली. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास पांगरे पुलालगत उभी केलेली त्यांची चारचाकी गाडी सुरू करताना हँडब्रेक व्यवस्थित ओढलेला नसल्याने वाहन अचानक मागे सरकू लागले.

वाहनाच्या मागील बाजूस सुमारे ५० फूट खोल दरी असून त्यामध्ये मोठमोठे दगड आहेत. गाडी घसरत घसरत दरीच्या दिशेने गेली आणि जवळपास ७५ टक्के भाग दरीत झुकला. मात्र, सुदैवाने त्या ठिकाणी असलेल्या दाट झुडपांमध्ये आणि रानवेलींमध्ये वाहन अडकून राहिल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेच्या वेळी वाहनात सात जण होते. प्रसंगावधान राखत सर्वांनी वाहनाच्या पुढील दरवाजातून बाहेर पडून सुरक्षितता साधली. बाहेर आल्यानंतर वाहन ज्या अवस्थेत दरीच्या काठावर अडकले होते ते दृश्य पाहून सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. वाहनाने एक जरी पलटी घेतली असती तर ते थेट दरीत कोसळून भीषण अपघात घडण्याची शक्यता होती.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दरीच्या उंबरठ्यावर अडकलेल्या वाहनामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. रानवेली आणि झुडपांनीच सात जणांचे प्राण वाचवल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. मोठा अनर्थ टळल्याने भाविकांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

रानवेली ठरल्या ‘देवदूत’!

दरीच्या काठावर पोहोचलेली कार दाट रानवेली आणि झुडपांमध्ये अडकली नसती, तर सात जणांचे प्राण धोक्यात आले असते. त्यामुळे या नैसर्गिक आधारालाच स्थानिकांनी ‘देवदूत’ अशी उपमा दिली असून, या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!