रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनने चांगलीच सुरुवात केली असून बुधवारी (१० जून) विविध तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमानाची नोंद झाली. जिल्ह्यात आज एकूण २२८.२७ मिमी पाऊस झाला असून सरासरी पर्जन्यमान २५.३६ मिमी इतके नोंदविण्यात आले आहे.
आजच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ७५.८८ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल गुहागरमध्ये ६०.०० मिमी तर संगमेश्वरमध्ये ३०.०८ मिमी पाऊस झाला. दापोलीमध्ये १३.४२ मिमी, चिपळूणमध्ये १२.७७ मिमी, लांजामध्ये १६.०० मिमी, राजापूरमध्ये १०.३७ मिमी, मंडणगडमध्ये ५.०० मिमी आणि खेडमध्ये ४.७५ मिमी पर्जन्यमान नोंदविण्यात आले.
किनारपट्टीसह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतकरी वर्गाकडूनही या पावसाचे स्वागत करण्यात येत असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेआहे.



