चिपळूणच्या उपनगराध्यक्षांना उद्धट उत्तर; भाजपचा महावितरण कार्यालयावर धडक

चिपळूण : शहरातील नागरिकांच्या वीजविषयक समस्यांबाबत उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांनी महावितरण कार्यालयाशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता कर्मचारी एस. आर. सावर्डेकर यांनी अयोग्य व उलटसुलट उत्तरे दिल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ भाजप पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी महावितरण कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.
नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी संपर्क साधलेल्या लोकप्रतिनिधींना अशा प्रकारची वागणूक देणे अयोग्य असल्याची भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली. महावितरण कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणी झालेल्या चर्चेनंतर कर्मचारी एस. आर. सावर्डेकर यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य करत उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. भविष्यात अशा प्रकारची घटना घडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
यावेळी नगरसेवक शशिकांत मोदी, शुभम पिसे, संदीप भिसे, अंजली कदम, रसिका देवळेकर, शीतल रानडे, आशिष खातू, रावी मोरे, लियाकत शहा, विजय चितळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणने नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देऊन लोकप्रतिनिधींशी सुसंवाद राखावा, अशी मागणीही यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आली.



