शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू; ३० जून व १५ जुलैपर्यंत मुदत
समाजकल्याण विभागाचे आवाहन : प्रवेश न मिळाल्यास 'स्वाधार'चा लाभ

रत्नागिरी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ तर ११ वी आणि १२ वीच्या (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांसाठी १५ जुलै २०२६ पर्यंत मुदत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर बडगुजर यांनी केले आहे.
मागासवर्गीय व इतर पात्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनुकूल वातावरण मिळावे, यासाठी ही शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येते. या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजनासह ग्रंथालय, अभ्यासिका, वाय-फाय इंटरनेट, व्यायामशाळा आणि शैक्षणिक साहित्य यांसारख्या विविध आवश्यक सुविधा पुरविल्या जातात. प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावी यासाठी ती पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे.
प्रवेशासाठी पात्रता व अटी:
प्रवर्ग : अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT), विशेष मागास प्रवर्ग (SBC), आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (EBC), दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थी.
उत्पन्न मर्यादा : विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपर्यंत असावे.
रहिवासी : अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
‘स्वाधार’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज बंधनकारक
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असूनही केवळ जागा उपलब्ध नसल्यामुळे प्रवेश न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्वाधार योजने’चा लाभ दिला जातो. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केलेला असणे अत्यंत बंधनकारक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत एकूण ९ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून, यामध्ये मुलांसाठी ५ आणि मुलींसाठी ४ वसतिगृहांचा समावेश आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची प्रत संबंधित शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांकडे सादर करावी. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी कार्यालय किंवा संबंधित शासकीय वसतिगृहाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



